Shri Navnath Bhaktisar Adhyay – 5 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 5

 

Shri Navnath Bhaktisar Adhyay

मच्छिंद्राकडून वेताळाचा पराभव व त्यास सांगितलेल्या अटी….

 

मच्छिंद्रनाथाने हिंगळादेवीचे दर्शन घेतल्यानंतर तो तेथून जो निघाला तो बारामल्हार नामक अरण्यात गेला व तेथे एका गावात मुक्कामास राहिला. रात्री एका देवालयात स्वस्थ निजला असता सुमारे दोनप्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकू येऊन असंख्य दिवट्या त्यास दिसल्या. हे पाहून भुतावळ उठली, असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले व काही चमत्कार दाखवून त्या सर्वांस अनुकूल करून घ्यावे, असा त्याने विचार केला. मग त्याने लागलीच स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राच्या अत्यद्भुत शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतावळ तेथे खिळून राहिली. त्यांना हालचाल करिता येईना व ती सर्व भूते झाडाप्रमाणे चिकटून राहिली. ती भुते नित्यनियमाप्रमाणे वेताळाच्या भेटीस जाण्यास निघाली होती; परंतु मध्येच हा प्रसंग पडल्यामुळे ती त्या दिवशी वेताळास भेटली नाहीत. इकडे वेताळाने ती का आली नाहीत ह्याची चौकशी करण्यासाठी दुसरी भुते तिकडे पाठविली. मग पाच-सात भुते वेताळाची आज्ञा मान्य करून शरभतीरी आली आणि शोध करून पाहू लागली, तो ह्यांची अशी झालेली अवस्था त्यांच्या दुरून दृष्टीस पडली मग ती त्यांच्याजवळ जाऊन चौकशी करू लागली. तेव्हा तेथे कोणीएक सिद्ध आला असून त्याच्या सामर्थ्याचा हा सर्व खेळ असल्याचे समजण्यात आले. मग तो सिद्ध कोठे उतरला आहे, ह्याचा तपास करीत फिरत असता, मच्छिंद्रनाथास वेताळाकडुन आलेल्या भुतांनी पाहिले. तेव्हा ह्याचीच अद्भुत करणी असावी, असा त्यांच्या मनात संशय आला. मग त्या भुतांनी मच्छिंद्रनाथाजवळ जाऊन त्याची प्रार्थना केली की, स्वामी ही भुते पतित आहेत, ह्यांची मुक्तता करावी; म्हणजे ती गरीब बिचारी आपापल्या कामकाजास जातील. त्यावेळी ही सर्व भुते खिळली असता, तुम्हीच मोकळे कसे राहिलात म्हणून त्यांस विचारिले. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ही भुते आज आली नाहीत म्हणून त्यांचा तपास करण्याकरिता वेताळाने आम्हांस इकडे पाठविले आहे. तर महाराज ! यांची सुटका करावी म्हणजे ही वेताळाकडे पाया पडण्यासाठी जातील. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी त्यांना कदापि सोडणार नाही, हा माझा निरोप तुम्ही वेताळाला सांगा, म्हणजे तो कितपत प्रबल आहे हे पाहता येईल.

 

मच्छिंद्रनाथाचा असा अभिप्राय पडल्यानंतर ती भुते लागलीच परत वेताळाकडे गेली आणि त्याच्या पाया पडून म्हणाली की, तिकडे एक योगी आला आहे, त्याने शरभतीरावरची भुते मंत्राच्या जोराने एका जागी खिळवून टाकिली आहेत व तुम्हांलाहि तसेच करून टाकण्याचा त्याने निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळाची नखशिखात आग झाली. त्याने सर्व देशातील भुतावळ आणण्यासाठी जासूद पाठविले. त्याप्रमाणे सर्वांनी येऊन वेताळास नमस्कार केला. त्यांना वेताळाने साराकच्चा मजकूर कळविला. मग सर्व जण आपापल्या फौजेनिशी शरभतीरि येऊन दाखल झाले व तेथे भयकारक भूतचेष्टा करून दाखवू लागले. हे मच्छिंद्रनाथाने पाहून भस्म मंत्रून ठेविले व त्यांचा प्रताप किती आहे ते पाहण्याच्या विचाराने काही वेळ उगाच राहिला. पुढे त्याने वज्रस्त्रमंत्र जपून सभोवती एक रेघ ओढिली व वज्रशक्ति मस्तकावर धरिली, तेणेकरून भुतांना जवळ जाता येईनासे झाले. भुतांच्या राजांनी झाडे, डोंगर नाथावर टाकिले, परंतु त्यांचे काही चालले नाही. त्यांनी आपल्याकडून सर्व शस्त्रे अस्त्रे सोडून इलाज केले, परंतु मच्छिंद्रनाथापुढे ते दुर्बळ ठरले. शेवटी मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र योजून सर्व भूतांना एकदम खिळवून टाकिले. त्या वेळी पिशाच्चांच्या अष्टनायकांपैकी झोटिंग, खेळता, बावरा, म्हंगदा, मुंजा, म्हैशासुर व धुळोवान हे सातजण मच्छिंद्रनाथाचे पाय धरून ओढण्याची वाट पाहात होते. पण तितक्यात नाथाने चपळाइने वज्रास्त्र सिद्ध करून ते सर्व दिशांकडे संरक्षणासाठी ठेविले व दानवास्त्र सिद्ध करून मृदु, कुंमक, मरु, मलीमल, मुचकुंद, त्रिपुर, बळजेठी हे सात दानव निर्माण केले. मग सात दानव व सात भूतनायक यांची झोंबी लागली. एक दिवसभर त्यांचे युद्ध चालले होते, पण दानवांनी त्यास जर्जर करिताच ते अदृश्य झाले. शेवटी मच्छिंद्रनाथाने वासवशक्ति सोडून वेताळास मूर्च्छित केले. त्याची अगदी प्राण जाण्याची वेळ आली, तेव्हा निरुपाय होऊन त्याने निरभिमानाने मच्छिंद्रनाथास शरण जाऊन प्राण वाचवून घेण्याचा बेत केला.

 

मग वेताळासह सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली की आमच्या मरणाने तुला कोणता लाभ व्हावयाचा आहे? आमचे प्राण वाचविल्याने आम्ही जगात तुझी कीर्ति गाऊ व तू सांगशील ते काम करू. यमाजवळ यमदूत आहेत, विष्णुजवळ विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही अवघे आपापल्या पिशाच्चफौजेसहित तुझ्याजवळ राहून तुझा हुकुम मानू. हे वचन जर आम्ही असत्य करू तर आम्ही आमच्या पूर्वजांस नरकात टाकू अशी भुतांनी दीनवाणीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की साबरी विद्येवर माझे कवित्व आहे, याकरिता जो मंत्र ज्या प्रकरणाचा असेल, त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्राबरहुकूम कार्य सिद्ध होण्यासाठी तुम्ही मंत्र जपणाराला साह्य करावे. तसेच मंत्र घोकून पाठ करणारासहि मंत्र सफल झाला पाहिजे. हे सर्व मच्छिंद्रनाथाचे म्हणणे सर्वांनी संतोषाने कबूल केले. तसेच, त्यांचे भक्ष्य कोणते हे सर्व त्यांना सांगून ठेविले आणि मंत्राच्या सिद्धतेची वेळ ग्रहणामधली कायम केली.

 

याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सर्व प्रकारच्या लागणाऱ्या कबुलायती वेताळाजवळून करून घेतल्या. नंतर प्रेरक अस्त्राची योजना करून त्यांना मोकळे केले. मग सर्व मंडळी मच्छिंद्रनाथाच्या पाया पडली व त्यांनी जयजयकार करून त्याची स्तुति केली व त्यास नमस्कार करून सर्व आपापल्या ठिकाणी गेले.

 

॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti