Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the rank-math domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u798046542/domains/knowinmarathi.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Shri Navnath Bhaktisar Adhyay - 2 श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय 2 -

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 2 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 2

Shri Navnath Bhaktisar Adhyay

मच्छिंद्रनाथास दत्तात्रेय व शंकराचे दर्शन; देवीचा उपदेश, सूर्यापासून वरप्राप्ति, ब्राह्मण स्त्रीस भस्मदान….

 

शंकर व दत्तात्रेय वनात निघाले व वनशोभा पहात पहात ते भागीरथीच्या तीराने जात होते तो त्यांची नजर मच्छिंद्रनाथाकडे गेली. त्याची स्थिति पाहून या कलीमधे दृढनिश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्याच्या वृत्ताबद्दल त्यांना विस्मय वाटला. मग आपण तेथे एक ठिकाणी उभे राहून शंकराने दत्तात्रेयास मच्छिंद्रनाथाकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले.

 

मग दत्तात्रेय मच्छिंद्राजवळ जाऊन उभा राहिला व कोणत्या इच्छेस्तव आपण येथे तप करीत आहा, वगैरे खुलासा विचारू लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथाने डोळे उघडून दत्तात्रेयाकडे पाहिले. मग मान हलवून नमन करून म्हटले, महाराज ! आज मला येथे बारा वर्षे झाली. पण आजपावेतो मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नसता आपण आज एकाएकी मला विचारीत आहा, त्याअर्थी आपण कोण आहा हे प्रथम मला कळवावे व ज्याअर्थी आपले दर्शन झाले आहे त्याअर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे. ते ऐकून दत्तात्रेय सांगू लागला. मी अत्रि ऋषीचा पुत्र आहे. मला दत्तात्रेय असे म्हणतात. आता तुझी इच्छा काय आहे, ती मला सांग. हे ऐकून, आज आपली तपश्चर्या फळास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्राने दत्ताच्या पायांवर मस्तक ठेविले. त्यास प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रांतून एकसारखे पाणी वाहू लागले; तेणेकरून दत्ताचे पाय धुतले गेले. नंतर तो दत्तात्रेयास म्हणाला, महाराज ! आपण साक्षात भगवान आहा. शंकर, विष्णु व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतरला आहा, असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगिकार करावा. असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागला.

 

मग दत्तात्रेयाने त्यास सांगितले की, तू चिंता करू नको; तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. असे बोलून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला. तेणेकरून मच्छिंद्रनाथाचे अज्ञान तत्काळ निघून गेले व तत्क्षणीच सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. मग शंकर व विष्णु कोठे आहेत ते मला सांग, असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले की, ईश्वरावाचून मला दुसरे काही दिसत नाही. सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ति आहे. हे त्याचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून दत्तात्रेय त्याचा हात धरून त्यास घेऊन जाऊ लागला. मग हा पूर्वीचा कविनारायण असे जाणून शंकराने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरिले आणि त्याजकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रेयास सूचना केली. मग दत्तात्रेयाने त्यास सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय नाथसंप्रदाय निर्माण करून दत्तात्रेय व शंकर निघून गेले. मग मच्छिंद्रनाथहि तीर्थयात्रा करावयास निघाला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगीस गेला. तेथे त्याने भक्तिपूर्वक अंबेचे दर्शन घेतले व स्तुति केली. त्या समयी साबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्याच्या मनात येऊन गेले. ह्या कवित्वाच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्याची कल्पना होती; परंतु दैवत अनुकूल झाल्यावाचून कार्यसिद्धि व्हावयाची नाही अशीहि त्याच्या मनात शंका आली. मग त्याने अंबेसन्निध सात दिवसपर्यंत अनुष्ठान केले. तेव्हा अंबा प्रसन्न झाली व कोणता हेतु मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग, म्हणून म्हणाली. त्याने सांगितले की, मातोश्री ! साबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे, तरी माझा हेतु पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा. मच्छिंद्रनाथाचा असा मनोदय जाणून, ‘तुझे मनोरथ पूर्ण होतील.’ असा देवीने त्यास आशीर्वाद दिला. मग त्याच्या हातात हात घालून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा वृक्ष होता. तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा देदीप्यमान असा त्यास दिसू लागला. तसेच झाडांच्या फांद्यावर नाना दैवते बसली आहेत असेही त्यास दिसू लागले.


असा चमत्कार अंबिकेने त्यास दाखविला. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहात होती. पण बोलत चालत नव्हती. नंतर अंबेने त्यास सांगितले की, तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वत आहे, त्यावर महाकालीचे स्थान आहे, तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर. तेथून दक्षिणेकडे नदीवर जा. तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे दिसतील, त्यातील शुक्लवेल तोडून एक एक कुंडात टाक. ती कुंडे शंभर आहेत; पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर. त्या योगाने तुला मूर्च्छना होऊ लागल्यास बारा आदित्य स्मरून जप करवा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन बारा आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झाला तर सहा महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा. दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल. असे सांगून देवी आपल्या स्थानी गेली. पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला. तेथे त्याने महाकाळीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहावयास लागला. इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे शंभर कुंडे त्याच्या पाहण्यात आली. त्यात त्याने शुक्लवेल टाकिला. पुन्हा परत येऊन पाहू लागला, तो आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाने आलेली दिसली. मग त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन करिताच त्यास मूर्च्छना आली. म्हणून त्याने देवीच्या सांगण्याप्रमाणे द्वादश आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्याजजवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील, म्हणून वर दिला.


सूर्याने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरुन घेऊन मार्तंड पर्वतावर गेला व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडला. सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच तेथे सूर्य प्रसन्न झाला आणि काय हेतु आहे, म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, कविता करावी असे माझ्या मनात आहे; तर त्वा साह्यभूत होऊन मंत्रविद्या सफळ करावी. मग सूर्य त्याचे हेतु पूर्ण होण्यासाठी त्यास सर्वस्वी साह्यभूत झाला. याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने सात महिने ये-जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगाल्यात चंद्रगिरी गावास गेला. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. त्याने अंगणात उभे राहून ‘अलख’ शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठला असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला.


सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म शेणात खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्हेाने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गोठ्याजवळ केरकचरा, शेण वगैरे टाकण्याची जी खांच होती, त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले.


बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. ”मुलगा कुठ आहे?” नाथांनी विचारले. ”मला मुलगा झालाच नाही.” तिने सांगितले. ”खोट बोलू नकोस ! त्या भस्माचे काय झाले?” नाथांनी प्रश्न केला. ”मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले. योगीराज, मला क्षमा करा !”. मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली.


”हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये!”. ”गुरुराया, मी इथ आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा.”मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले. अस्त्रविद्येतही निपुण केले.


असे हि म्हणतात कि मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली “चलो गोरख!” त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले “आदेश!” मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले. हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला.


योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेकमार्तंड, गोरक्षबोध, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत.


शके सतराशे दहापर्यंत सर्व नवनाथ प्रगटरूपाने फिरत होते. नंतर ते गुप्त झाले. गिरनारपर्वतातील श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नावही आढळते. महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते.

॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti