Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

चिकूपिकूचा लहान मुलांना कसा उपयोग होतो ?

chikupiku uses in childrens

Chikupiku Uses in Childrens माझा लहान मुलगा २ वर्षाचा असल्यापासून आम्ही चिकूपिकूच्या गोष्टी ऐकतो आहोत. यामधील कवितांची लयबद्धता छोट्या कबीरला खूप आवडली आणि आमचा प्रवास सुरु झाला. मराठी गोष्टींमुळे त्याचा शब्दसंग्रह तर वाढलाच, पण त्यासोबत चिकूपिकू मध्ये ज्या ८ बुद्धिमत्ता दिलेल्या असतात त्याची ओळख आम्हाला झाली आणि आम्ही त्याप्रमाणे मुलांचे निरीक्षण करायला लागलो, त्यांच्याशी संवाद साधायला लागलो. या मुलांमध्ये एक एक सायंटिस्ट आणि आर्टिस्ट आम्हाला दिसू लागला आहे. 

कबीर दिवसभरात भरपूर शोध लावत असतो. कपड्याची वेगवेगळी घडी घालणे, रंगाचे पाणी तयार करणे, दगडापासून माती तयार करणे, मातीचे पाणी तयार करणे असे कितीतरी प्रयोग. चिकूपिकू मधील ‘आर्टिस्ट कट्टा’ हे सदर माझ्या मोठ्या 10 वर्षाच्या मुलाला खूप आवडते. तो आवर्जून चिकूपिकू वाचतो आणि आपल्या लहान भावालाही वाचून दाखवतो. त्याच्या चित्रकलेमधून त्याने केलेले वाचन आणि निरीक्षण आम्हांला नेहमीच पाहायला मिळते.  त्याच्या चित्रांमध्ये नेहमीच एक वेगळेपणा दिसून येतो.आमच्या घरातील बाथरूमचा सबंध दरवाजा कुबेरने ‘अबोरिजनल आर्ट‘ या पद्धतीने पेंट केलेला आहे :).  छोटा कबीरदेखील चित्र निरीक्षण करून त्याची कला घरभर भिंतीवर दाखवत असतो. रेषांचा वापर करून किती छान चित्र तयार होतात याची जाणीव आम्हाला चिकूपिकूच्या आभाताईने दिली. गोष्टीसाठी काढलेली चित्रे ही नेहमीच गोष्ट, गोष्टींमधील लपलेले शब्द समजून घेण्यासाठी मदत करतात.

चिकूपिकू दर महिन्याला एक नवीन विषय घेऊन येतं. गोष्टी आणि कविता /activities या विषयाला धरून असतात, त्यामुळे महिनाभर मुले त्या विषयामध्ये समरस होऊन विषय समजून घेऊन त्यांची कला वापरतांना आम्हाला दिसतात.

चिकूपिकूमुळे आम्ही पालक निसर्गासोबत जोडले गेलो ते म्हणजे निसर्गविषयक बुद्धिमत्तेमुळे आणि तेच आम्ही मुलांपर्यंत खूप सोप्या पद्धतीने पोहचवू शकत आहोत. अळ्या, किडे, बेडूक, साप, मासे, पान, फुले, झाड याबद्दल असलेल्या माहितीमुळे आणि समर्पक अशा चित्रांमुळे दोन्ही मुले त्यांची आवड स्पष्टपणे आम्हाला सांगतात. दोघेही निसर्गात रमतात आणि शोधक दृष्टीने खूप साऱ्या गोष्टी नव्याने शोधत असतात.

चिकूपिकू अंकातल्या झाडीगोडीबद्दल पण सांगायला मला फार आवडेल. छोट्या कबीरला झाडांची पाने, फुले गोळा करायला खूप आवडतं. बाहेर जातांना कबीर आठवणीने पिशवी सोबत घेतो म्हणजे कुठे फुले दिसली की ती घरी आणायची आणि मग त्यापासून आपल्या सायकलसाठी हार बनवता येईल, मम्माच्या किचनमधल्या फुलदाणीमध्ये फुलं ठेवता येतील किंवा मम्माला केसांमध्ये लावून देता येतील.

झाडीगोडी मध्ये पारिजातकच्या फुलाची गोष्ट वाचून कबीर भारीच खुश झाला आणि मला म्हटला, “मम्मा आपल्या फुलाची गोष्ट इथे कशी काय आली?” पारिजातकचे फुल कबीरला खूप आवडते आणि मग तेव्हा पासून चिकूपिकूतला हा झाडांचा कप्पा आमच्या आवडीचा झाला तो म्हणजे ‘झाडी गोडी’. सध्या वडाच्या झाडाचा आम्ही ध्यास घेतला आहे. जिथे जाऊ तिथे आम्हाला वडाचे झाड दिसते. वडाचे झाड कसे ओळखायचे असे मी कबीरला विचारले असता कबीर म्हटला,” मम्मा, त्याला पारंब्या असतात म्हणजे ते वडाचे झाडं..” एके दिवशी बाहेर गेलो असताना झाड बघून कबीर आम्हाला म्हटला “मम्मा, वडाचे झाड बघ”

मी: अरे कबीर, हे झाड वडाचे नाही रे बाबा!

कबीर: अग पण त्याला पारंबी आहे ना!!

मी: हो रे, खरच की!! पण हे ‘वड’ नाही.. आता काय करायचे..?

मग आम्ही वडाच्या झाडाला नीट पाहून ठरवले की झाडाची पान ही बरीच वेगळी आहेत. मग कबीरला कळले की वडाला अंड्यासारखी पान असतात. मग तेव्हा पासून वडाचे झाडं अधिक चांगल्या प्रकारे कबीरला कळले आणि आता कबीर म्हणतो, ” बाकीच्या झाडांना एकाच पानाला खूप सारे अंडे असतात तर वडाला एकच मोठे अंडे असते आणि पारंब्या असतात…” कबीरच्या दादाच्या शाळेत ‘Our national tree is Banyan tree’ असे कबीरचा दादा शिकला होता, पण नेमके वडाचे झाडं म्हणजे Banyan tree हे दादाला कबीरकडून कळले. आता कबीर आम्हाला सतत वडाची झाड दाखवत असतो आणि मग आमची चर्चा होत असते किती जुने असेल हे झाड किती पारंब्या आहेत…!

चिकूपिकूमधील my corner मधील कविता/गोष्ट/माहिती कुबेरसाठी नेहमीच motivational असते. जरी चिकूपिकू हे १-८ वर्ष वयोगटासाठी असले तरी माझ्या मोठ्या मुलाचे मराठी सुधारण्यासाठी आणि त्याला मराठी भाषेशी बांधून ठेवण्यासाठी आम्हाला चिकूपिकूची खूप मोठी मदत होत आहे. चिकूपिकूमूळे आम्हाला कुबेरमध्ये लपलेला मराठी बालकवी सापडला.

 चिकूपिकू टीमतर्फे वेळोवेळी होणारी वर्कशॉपदेखील खूप माहिती देणारी असतात.चिकूपिकू टीमचे खूप धन्यवाद!!!!!

कांचन बढे (कबीर आणि कुबेरची आई)

Exit mobile version