Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the rank-math domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u798046542/domains/knowinmarathi.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Shri Navnath Bhaktisar Adhyay - 3 श्री नवनाथ भक्तिसार - अध्याय 3 -

Shri Navnath Bhaktisar Adhyay – 3 श्री नवनाथ भक्तिसार – अध्याय 3

 

Shri Navnath Bhaktisar Adhyay

मारुती व मच्छिंद्रनाथ यांची भेट; मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्याकडे गमन ….

 

मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथादि तीर्थयात्रा करून सेतुबंध-रामेश्वरास गेला. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे, तो आपणास राहावयाकरिता दरडी उकरून गुहा करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास विस्मय वाटला. त्याने मारुतीला म्हटले की, मर्कटा ! तू अगदीच मूर्ख आहेस. शरीराच्या संरक्षणाकरिता तू आता सोय करीत आहेस. अरे ! पाऊस एकसारखा सपाटून पडत आहे; आता तुझे घर केव्हा तयार होईल? घरास आग लागल्यानंतर विहीर खणावयास लागावे, तद्वत पाऊस पडत असता तू आता घराची तजवीज करतोस हे काय? असे मारुतीला मच्छिंद्रनाथाने म्हटल्यानंतर, तू असा चतुर दिसतोस तो कोण आहेस, म्हणून मारुतीने मच्छिंद्रनाथास विचारिले. तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात, असे मारुतीने मच्छिंद्रास विचारिले. तेव्हा माझा शक्तिप्रताप पाहून लोक मला जती म्हणतात, असे त्याने उत्तर दिले. त्या वेळेस मारुती म्हणाला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत होतो, असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात ! पण आता ते कसेहि असो, मी काही दिवस मारुतीच्या शेजारी होतो, यास्तव त्याच्या कलेचा हजारावा हिस्सा माझ्या अंगी महान प्रयासाने आला आहे, तो मी या समयी तुला दाखवितो. त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव, नाही तर जती हे नाव तू टाकून दे.

 

याप्रमाणे मारुतीने मच्छिंद्रनाथास किंचित लावून म्हटल्यानंतर त्याने उत्तर दिले की, तू मला कोणती कला दाखवीत आहेस ती दाखव, तिचे निवारण श्रीगुरुनाथ करील. हे ऐकून मारुतीस अत्यंत राग आला. मग तो लागलीच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप धरून त्याने मच्छिंद्रनाथास न कळू देता अचानक त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले. ते आकाश मार्गाने ढगांप्रमाणे येत आहेत हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात येऊन ‘स्थिर स्थिर’ असे त्याने वातप्रेरकमंत्रशक्तीच्या योगाने ते पर्वत जागच्या जागी अटकवून ठेवले. पुढे मारुती एकावर एक असे शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता. पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत तेथल्या तेथेच खिळवून टाकिले. हे पाहून मारुती रागाने प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे भडकून गेला व एक मोठा पर्वत उचलून तो मस्तकावर घेऊन तो फेकून देण्याच्या बेतात आहे. तोच मच्छिंद्रनाथाने पाहिले. मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन, वायुआकर्षणमंत्र म्हणून जोराने ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथेच जसाच्या तसा खिळवून टाकिला. त्यावेळी त्याचे चलनवलन बंद झाले. मारुतीने वर हात करून मस्तकावर पर्वत धरून ठेविला होता तो तसाच राहिला, ते पाहून वायूने आपल्या पुत्रास (मारुतीस) पोटाशी धरिले. नंतर त्यास या संकटातून सोडविण्याकरिता वायूने मच्छिंद्रनाथास विनंति केली. ती नाथाने मान्य करून पुन्हा उदक मंत्रून शिंपडले. तेणेकरून पर्वत जेथल्या तेथे गेला व मारुतीहि पूर्वस्थितीवर आला. नंतर मारुतीने जवळ जाऊन ‘धन्य धन्य’ म्हणून नाथास शाबासकी दिली. इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की, बाबा मारुती ! तुझे या सिद्धापुढे काही चालावयाचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकिले. याची शक्ती अघटित आहे. तू कदाचित मला असे म्हणशील की, तुम्ही आपल्या तोंडाने त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता; तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आहे आणि याने आपल्या भक्तीच्या जोराने सकल दैवते आपली ताबेदार करून टाकिली आहेत.

 

नंतर मच्छिंद्रनाथ वायूच्या व मारुतीच्या पाया पडला आणि आपणाशी सख्यत्वाने वागण्याकरिता त्याने त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न चित्ताने म्हणाले की, तुझ्या कार्याकरिता आम्ही उभयता झटून तुला सर्व प्रकारे साह्य करू व पाहिजे तसे करून तुला सुख देऊ. असे प्रफुल्लित मनाने बोलून, आता ‘आपण जती आहो’ असे तू खुशाल सांगत जा, असे मारुतीने वरदान दिले. त्या वेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की, मी जती या नावाने विख्यात होईन हे तर ठीकच आहे ! पण माझ्या मनात एक शंका आली आहे, तिची आपण निवृती करावी. कोणती शंका आली आहे, असे मारुतीने विचारल्यावर त्याने सांगितले की तू त्रिकाळज्ञानी आहेस, असे असता माझ्याशी विनाकारण वितंडवाद कशासाठी केलास? तुझी माझी नागाश्वत्थाच्या झाडाखाली पूर्वीच भेट झाली होती, त्या वेळेस साबरी विद्येचे मजकडून कवित्व करवून तू मला वरदान दिले आहेस, असे असता हा बखेडा का उत्पन्न केलास? हे ऐकून मारुतीने मच्छिंद्रनाथाचे असे समाधान केले की, जेव्हा तू समुद्रस्नान करीत होतास त्या वेळेस मी तुला ओळखल्यावरून तुझ्याजवळ आलो. तू कविनारायणाचा अवतार आहेस व मत्स्यीच्या पोटी जन्म घेतलास हे पक्के ठाऊक होते; परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की, नागाश्वत्थाच्या वृक्षाखाली देवांनी जे अभिवचन तुला दिले, त्या वरप्रदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे आपण एकदा पहावे. शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ प्रसंगामधून पार पडावयाचे आहे, म्हणून तू हिंमत करून पुढे कितपत टिकाव धरशील ह्याचाहि अजमास मला अशा रितीने पाहाता आला. असो.

 

नंतर मारुती म्हणाला, तू आता येथून स्त्रीराज्यात जा आणि तेथे खुशाल ऐष आराम कर तुझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा भार उतरला जाईल. मग असे कोणते ओझे तुजवर पडले आहे, म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारल्यानंतर, मारुतीने मुळारंभापासून सर्व कच्चा मजकूर त्यास सांगितला. मारुती म्हणाला, योगेश्वरा ! लंकेच्या रावणास जिवे मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता, तिच्या मनात आले की, मारुती निःसंशय रामाचा पक्का दास आहे, यास्तव आपल्या हातून त्याचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजे ह्याचे लग्न करून देऊन, संपत्तिसंतति सर्व अनुकूल करून देऊन, सर्व सुखसंपन्न करावे. स्त्रीवाचून संसारात सुख नाही, तर ती करून देऊन याजकडून सर्व संसार करवावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे भाषण मान्य करील की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला गृहस्थाश्रमी करण्याकरिता व मला वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजव्ळ बोलाविले व ममतेने माझ्या तोंडावरून हात फिरविला. नंतर सीतामाता मला म्हणाली. बा मारुती ! तू तिन्ही लोकामध्ये धन्य आहेस. माझे एक तुझ्याजवळ मागणे आहे, ते तू देशील तर फारच उत्तम होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस.

 

अशा प्रकारचे सीतेचे भाषण ऐकून मला संतोष वाटला. मग कोणते काम आहे असे मी तिजला विचारिले. परंतु मी आपले वचन दिल्यावाचून ती आपला हेतु मला कळवीना. असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव दाखवून तसे करण्याविषयी तिने मला भारी भीड घातली. तेव्हा मी महत संकटात पडलो व खिन्नवदन होऊन उगीच बसून राहिलो. तेव्हा तिने रागाने मजकडे पाहिले व मला सांगितले की, तू अगदी दिलगीर होऊ नको. स्त्रीराज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत; परंतु यातील मख्खी अशी आहे की, तुला व मला चार चौकडीस जन्म घ्यावयाचा असतो. मी व रामाने नव्याण्णव वेळा घेतला. तूहि नव्याण्णवावा मारुती आहेस व त्याप्रमाणे लंकाधीशहि नव्याण्णवावा होय. त्यास मारून आल्यानंतर तुला स्त्रीराज्यात जावे लागेल. तो योग आता घडून आला. यास्तव समयास अनुसरून वाग.

 

याप्रमाणे रामचंद्राने मला सांगितल्यानंतर मी स्त्रीराज्यात गेलो. त्यावेळी त्या ठिकाणी मैनाकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या अन्य भागावर मनुष्य, पशु, पक्षी आदिकरून सर्व स्त्रीपुरुष एके ठिकाणी आनंदाने रममाण होतात असे तिच्या ऐकिवात आले होते. ही कल्पना मनात उद्भवताच तिच्या अंगाची लाही लाही होऊन गेली. मग प्रत्यक्ष मारुतीचा संग घडावा म्हणून ती अनुष्ठान करू लागली. आपल्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुति दिल्या. असे अनुष्ठान तिने बारा वर्षेपर्यंत केले. त्यामुळे तिच्या अंगावरचे सारे मांस संपले. तरीहि तिचा निश्चय ढळेना. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंति करू लागली. तेव्हा तुझा कोणता हेतु आहे, म्हणून मी तिला विचारिले. तेव्हा ती मला म्हणाली की, मारुती ! तुझ्या भुभुःकारा पासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात, यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस. तेणेकरून सर्वांना सुख होते. परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुन करावे असे आहे. ही माझी इच्छा तू पूर्ण कर. मैथुनाची पद्धत तिन्ही लोकात चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नात सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिति आहे. तर तू ते सुख आम्हांस प्रत्यक्ष दे. असा तिने आपला अभिप्राय मला सांगितला. नंतर मी तिला सांगितले की, ब्रह्मचर्यव्रत मी कडक पाळतो असा माझा डंका सर्वत्र गाजत आहे; यास्तव ही गोष्ट माझेकडून घडावयाची नाही. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईल, तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल, तो मच्छिंद्रनाथ साक्षात कविनारायणाचा अवतार होय. त्याजपासून तुला तुझ्या तपाची फलप्राप्ति होईल. अशा युक्तीच्या मार्गाने मी तिचे शांतवन केले. तो योग आज घडुन आला; तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरथ पूर्ण कर.

 

मारुतीचे असे भाषण ऐकुन मच्छिंद्रनाथाने सांगितले की, मीहि ऊर्ध्वरेताच आहे; म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे? माझ्या ब्रह्मचर्याचा मात्र अशाने समूळ नाश होईल व जगात दुर्लौकिक होईल; म्हणून हे कुकर्म मला सांगू नये. तशात स्त्रीसंग हे अपकीर्तीचे भांडार होय; म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही.

 

अशा प्रकारचे मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकून मारुतीने त्यास सांगितले की, ही अनादिकालापासून रहाटी चालत आली आहे. म्हणून भोग भोगल्याचा दोष नाही. जसे नव्याण्णव मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आला आहे. तुझ्या पोटी मीननाथ म्हणून पुत्र होईल. त्याची सूर्यासारखी कीर्ति प्रगट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्याचे मन वळवून घेतले. मग मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात जाण्यास कबूल झाला व एकमेकांस नमस्कार करून ते दोघेजण मार्गस्थ झाले.

 

॥ ॐ चैतन्य श्री गोरक्षनाथाय नमः ॥

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti